बिटकॉइन

परिचय

२००८ मध्ये सतोशी नाकामोटो नावाच्या अज्ञात व्यक्तीने (किंवा ग्रुपने) “बिटकॉइन: अ पिअर-टू-पिअर कॅश सिस्टीम” हा लेख प्रसिद्ध केला नंतर या लेखावर आधारीत ओपनसोर्स (सर्वांसाठी खुले) सॉफ्टवेअर वापरात आलं आणि बिटकॉइन चा जन्म झाला. सुरुवातीला बिटकॉइनला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही पण आज (फेब्रुवारी २०२१ मध्ये) एका बिटकॉइनची किंमत ३८ लाखांवर गेली आहे आणि भविष्यातील चलन म्हणून बिटकॉइन कडे बघितलं जातंय. बिटकॉइन हे एक क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन) आहे आणि ते भविष्यातील देवाण-घेवाणची प्रमुख साधन होऊ शकत.

गरज

मुळात क्रिप्टोकरन्सीची आवश्यकता काय असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. भारताचच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर नोटबंदी नंतर देशात डिजिटल पेमेंटची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली. नागरिकांना आता डिजिटल पेमेंटची सवय झाली आहे. सध्याची अर्थव्यवस्था पैसे छापणे आणि त्याचे वितरण करणे यावर आधारित आहे. जवळ जवळ सर्व देशांचे स्वतःचे चलन आहे, काही देशांच्या चलनाला जास्त किंमत आहे तर काहींच्या कमी. अशातच काही मोजक्या देशांचे चलन मिळवण्यासाठी कृत्रिम फुगवटा तयार केला जातो तर कधी अवमूल्यन. तेलाच्या किमती, डॉलरचा भाव या सर्व गोष्टीमुळे एक अपरिपूर्ण आणि दोषरहित जागतिक अर्थव्यवस्थतेत आपण जगत आहोत. त्यामुळे सर्वांसाठी आणि सर्वाना समान वागणूक देणारं जागतिक चलन अस्तित्वात असणं गरजेचं होत. सतोशी नाकामोटोने प्रसिद्ध केलेल्या लेखानुसार पारदर्शी कॅशलेस पेमेंट सिस्टीम बनवणे हा बिटकॉइनचा हेतू आहे.

तंत्रज्ञान

बिटकॉइन हे क्रिप्टोग्राफी (सांकेतिक) आणि ब्लॉकचेन या दोन तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र आणि एकमेव ऍड्रेस मिळतो यावरून तो व्यक्ती बिटकॉइन पाठवू अथवा घेऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीने कोणाला कधी किती बिटकॉइन पाठवले याबद्दलची माहिती ब्लॉकचेनमध्ये साठवली जाते. हि माहिती एकाचवेळी बऱ्याच ठिकाणी साठवल्याने त्यात बदल करणे जवळपास अश्यक आहे. यामुळे प्रत्येक ट्रान्सफर बद्दल माहिती उपलब्ध राहते आणि प्रदर्शकता वाढते. प्रत्येक ट्रांसफर बद्दल माहिती व्हेरिफाय करण्यासाठी बिटकॉइन मायनर्स असतात. ते संगणकाच्या आधारे फेरपाडताळणी करतात आणि त्याबद्दल त्यांना बिटकॉइनदेखील मिळतात. एक फेरपाडताळणी करण्यासाठी १० मिनिटे लागू शकतात. जस जशी बिटकॉइन मायनर्सची संख्या वाढत जाईल तस तशी फेरपाडताळणी करणे कठीण होत जाणार आहे.    

बिटकॉइनची संख्या मर्यादित आहे आणि २०४० नंतर नवे बिटकॉइन माईन करणे शक्य होणार नसल्याने बिटकॉइनची किंमत वाढत चालली आहे.   

फायदे

बिटकॉइनच्या स्वरूपाने जगाला एक जागतिक चलन मिळेल.

जागतिक पातळीवर कॅशलेस सिस्टीम अस्तित्वात येईल.

पैसे देवाण-घेवाण करण्यात पारदर्शकता वाढेल.

पैसे पाठवण्यासाठी बँकेची फी द्यावी लागणार नाही.

इंटरनॅशनल पेमेंट सुखकर होतील. 

स्मार्टफोन द्वारे पेमेंट करता येतील.

त्रुटी आणि धोके

नक्की बिटकॉइन कोणी बनवलं आहे आणि त्यांच्याकडे किती बिटकॉइन आहेत याबद्दल माहिती उपलब्ध नाही.

बिटकॉइनची संख्या मर्यादित आहे.

बिटकॉइन मायनिंग मुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे कारण मायनिंगसाठी मोठ्या प्रमाणावर विजेची खपत होते.

बिटकॉइनच्या किंमती प्रचंड मोठ्या प्रमाणात वर-खाली होत असतात.

बिटकॉइनच्या वर देखरेख ठेवणारी कोणतीही संस्था अस्तिवात नाही. भारतात क्रिप्टोकरन्सीवर कायमस्वरूपी बंदी येण्याची दाट शक्यता आहे.

जे लोक बिटकॉइनकढे गुंतवणूक म्हणून बघत आहेत त्यांनी सावधानता बाळगली पाहिजे बिटकॉइन एक मोठी पॉन्झी स्कीम देखील असू शकते आणि त्यावर अनेक देश निर्बंध लादू शकतात.   

निष्कर्ष

जरी लोकांना बिटकॉइनमध्ये भविष्य  दिसत असलं तरीही त्यावर अंतिम निर्णय सरकारच घेतील. आणि भांडवलशाही युगात सरकार बँक सिस्टीम मोडीत काढणाऱ्या क्रिप्टोकरन्सीला सहजासहजी मान्यता देतील याबद्दल शंका आहेच. बिटकॉइनवर कोणाचं नियंत्रण नसल्याने तो गैरव्यवहार, आतंकवाद, अंमली पदार्थ तस्करी यासाठी देखील वापरला जातोय. २०११-१२ या साली बिटकॉइन ऑनलाईन ब्लॅक मार्केट साठी वापरलं गेलं यातून ९० लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार झाले. त्यामुळे बिटकॉइनबद्दल सावधगिरीचा पवित्रा घेतलेलाच बरा.

bitcoin satoshi nakamoto blockchain cryptocurrency akash jadhav


संबंधित व्हिडिओ


Share

आकाश जाधव

Software Engineer | Tech Enthusiast & Proud Geek

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.