ॲपल सिलिकॉन – एम १ चिप

परिचय

जून २०२० मध्ये ॲपलने स्वतःचे प्रोसेसर (संगणकीय आकडेमोड करणारी चिप) म्हणजेच “ॲपल सिलिकॉन” सहित नवीन मॅक कंप्युटर २०२० च्या वर्षाअखेर पर्यंत बाजारात आणायची घोषणा केली. यामुळे ॲपल आणि इंटेलची १५ वर्षांची भागीदारी संपणार यावर शिक्कामोर्तब झालं. इंटेल कंपनी प्रोसेसर व्यवसायात निपुण तर आहेच पण त्यासोबत या क्षेत्रात इंटेलचा जागितक दबदबादेखील आहे. तुमच्या आजूबाजूचे कंप्युटर / लॅपटॉप्स मध्ये इंटेलचा प्रोसेसर असण्याची शक्यता ९०% पेक्षा अधिक आहे. या सर्व गोष्टी विचारात घेता ॲपलने इंटेल प्रोसेसर सोडून स्वतःचे प्रोसेसर बाजारात आणायच्या घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. गमतीचा भाग म्हणजे ॲपलने यापूर्वी २००६-०७ या कालावधीत पॉवरपीसी सोडून इंटेल प्रोसेसरमध्ये मॅक कंप्युटरच अवस्थांतर(ट्रांसीशन) केलं होत. नोव्हेंबर २०२० मध्ये ॲपलने  “एम १” चिप सहित नवीन लॅपटॉप्स (मॅकबुक एअर आणि मॅकबुक प्रो) आणि सी.पी.यु. (मॅक मिनी) बाजारात आणले. ॲपल सिलिकॉन चिप्समुळे मरगळ आलेल्या वयक्तिक संगणक क्षेत्राला खडबडून जाग आली आहे आणि या पोस्टमध्ये आपण ॲपल सिलिकॉन या संगणक क्षेत्राचा कायापालट करू पाहणाऱ्या चिप बद्दल विस्तृतपणे चर्चा करणार आहोत.                      

ॲपल, जागतिक दर्जाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवण्यासाठी तर प्रसिद्ध आहेच त्याचबरोबर त्या उपकरणांवर संपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. ॲपलचे आयफोन, आयपॅड आणि ॲपल वॉच बद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल. मुळात ॲपल हि संगणक निर्मिती करणारी कंपनी आहे. १९७६ साली ॲपल कंपनी म्हणून नोंद झाली तेव्हा कंपनीचं नाव “ॲपल कंप्युटर्स” होत. पुढे ॲपलचा लाईफ स्टाईल ब्रँड म्हणून उदय झाला.

*ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच संगणक प्रणाली, सोप्या शब्दात कंप्युटर चालवणार सॉफ्टवेअर.

वयक्तिक संगणक क्षेत्र मुख्यतः तीन प्रकारे विभागलं आहे- 

१. मॅक – १९८४ मध्ये स्टीव्ह जॉब्ज यांनी पहिला मॅकिंटॉश कंप्युटर जगासमोर आणला. हा कंप्युटर ॲपलनेच बनवलेल्या “मॅकओएस” या ऑपरेटिंग सिस्टीम वरच  चालतो.

२. पी.सी. – पर्सनल कंप्युटर, या प्रकारात संगणक बनवणारी कंपनी वेगळी आणि ऑपरेटिंग सिस्टीम (संगणक प्रणाली) बनवणारी कंपनी वेगळी. या प्रकारात मुख्यतः एच.पी., डेल या सारख्या कंपन्या संगणक बनवण्यात आघाडीवर आहेत आणि ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट. या प्रकारात मायक्रोसॉफ्टच्या विंडोज या ऑपरेटिंग सिस्टमच वर्चस्व आहे आणि बहुतेक लोकांनी हि ऑपरेटिंग सिस्टम वापरली असेल.    

३. ओपन सोर्स – लायनस टोरवल्ड्स याने १९९१ साली “लिनक्स” हि ऑपरेटिंग सिस्टम जगासाठी खुली केली. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आपल्या सोयीनुसार बदल करून वापर करू शकतात.  हि ऑपरेटिंग सिस्टम विविध संगणकांवर चालते.            

असं असलं तरीही आतापर्यंत या सर्व संगणकांसाठी इंटेल/ ए.एम.डी. प्रोसेसरच वापरण्यात येत असत. हे प्रोसेसर CISC (कॉम्प्लेक्स इंस्ट्रक्शन सेट कंप्युटिंग) वर आधारित आहेत तर ॲपल सिलिकॉन एम १ RISC (रिड्युस्ड इंस्ट्रक्शन सेट कंप्युटिंग) वर आधारित आहे.

CISC आणि RISC

प्रोसेसर कडून काम करून घेण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमला काही आज्ञावली प्रोसेसरला द्याव्या लागतात. प्रोसेसर त्या आज्ञावली स्वतःच्या भाषेत रूपांतरित करून त्यांची आकडेमोड करतो आणि उत्तरे पाठवतो. या आज्ञावली काहीही असू शकतात जस कि बेरीज, वजाबाकी किंवा स्क्रीन वर चित्र दाखवणे इत्यादी.

CISC प्रकारात आज्ञावली संच मोठ्या प्रमाणावर आधीपासूनच उपलब्ध असतो त्यामुळे कमी मेमरीमध्ये आणि कमी सी.पी.यु. सायकल मध्ये जास्त आज्ञावली पूर्ण होतात. पण विजेची खपत जास्त असते.

RISC प्रकारात आज्ञावली संच मर्यादित असतो त्यामुळे मेमरीवर निर्भरता वाढते आणि आज्ञावली साठी सी.पी.यु. सायकल कमी होतो. पण विजेची खपत कमी असते.   

ॲपलला RISC  प्रोसेसर किंवा ARM (ऍडव्हान्स RISC मशीन)  प्रोसेसर  बनवण्याचा १० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. तो अनुभव एकत्रित करून त्यांनी “एम १” प्रोसेसर “५ नॅनोमीटर प्रोसेस” वापरून बनवला आहे. या एका चिपवर १६ अब्ज ट्रान्सिस्टर्स आहेत.

*१९६० मध्ये १ ट्रान्सिस्टर ५ इंच आकाराचा होता.

एम १ चिपची मुख्य फीचर्स खालील प्रमाणे:

१. सिस्टीम ऑन चिप (SoC)

एम १ चिपच्या आधी सी.पी.यु. मध्ये रॅम, प्रोसेसर, कॅशे, ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट या मदरबोर्डवर वेग-वेगळ्या ठिकाणी असत. एम १ चिपमध्ये या सर्व गोष्टी आणि न्यूरल इंजिनसहित एकाच चिपवर इंटिग्रेट करण्यात आलं आहे. यालाच सिस्टीम ऑन चिप (SoC) म्हणतात.   

   

Image By – Apple

२. युनिफाईड मेमरी

एम १ मध्ये यूनिफाईड मेमरी आर्किटेक्चर (UMA) वापरण्यात आलं आहे. याचा एक फायदा असा कि जो डाटा मेमरी मध्ये आहे तो SoC वरील विविध भाग वापरू शकतात. यामुळे डाटा विविध मेमरीमधे कॉपी करून ठेवायची आवश्यकता राहत नाही. डाटा चिपवरच उपलब्ध असल्याने प्रोसेससिंग स्पीड वाढतो आणि विजेची खपत कमी होते. युनिफाईड मेमरी मुळे व्हिडिओ एडिटिंग, गेमिंग आणि इमेज प्रोसेससिंग जलद गतीने करता येणे शक्य झालं आहे.

Image By – Apple

३. ८ कोर सी.पी.यु.

८ कोर पैकी ४ कोर हे हाय परफॉर्मन्स कोर आहेत. या ४ कोर वर अवजड कामे जसे कि व्हिडिओ एडिटिंग होतात. तर इतर ४ कोर सर्वसाधारण कामासाठी वापरतात जसे कि ईमेल बघणे.

Image By – Apple

*सी.पी.यु. कोर एका वेळी प्रोसेसर किती कामं (आज्ञावली) हाताळू शकतो ते दर्शवत. तत्वतः जितके जास्त कोर तितकी कामे जलद होतील.

ॲपलच्या म्हणण्यानुसार एम १ चिप हि सध्याच्या इतर कोणत्याही नवीन प्रोसेसर पेक्षा दुप्पट वेगवान आहे. आणि एम १ इतर चिपच्या तुलनेत २५% विजेची खपत करून इतर नवीन चिप इतका परफॉर्मन्स देऊ शकत.

Image By – Apple

*इतर नवीन चिप कोणती याबद्दल ॲपलनं माहिती दिली नाहीये त्यामुळे कोणत्या चिपसोबत तुलना करण्यात आली आहे याबद्दल माहिती उपलब्ध नाही.

४. ८ कोर जी.पी.यु. (ग्राफिक्स प्रोसेससिंग युनिट)

बहुधा सर्व कंप्युटरमध्ये स्वतंत्र जी.पी.यु. असतो पण एम १ मधे तो चिपवरच उपलब्ध असल्याने कमी विजेची खपत करत उत्तम ग्राफिक्स दाखवण्यासाठी सक्षम आहे. ॲपलच्या म्हणण्यानुसार ८ कोर जी.पी.यु. इतर नवीन जी.पी.यु. पेक्षा दुप्पट वेगवान आहे.

Image By – Apple

५. १६ कोर न्यूरल इंजिन

भविष्यात असंख्य सॉफ्टवेअर्स ऑन डिव्हाईस मशीन लर्निंगचा वापर करतील. या चिपवरील १६ कोर न्यूरल इंजिनमुळे एम १ भविष्यकालीन वापरासाठी सुसंगत झाला आहे. हे न्यूरल इंजिन एका सेकंदमध्ये ११ ट्रिलियन आज्ञावली प्रोसेस करू शकत. 

Image By – Apple

६. बॅटरी

एम १ चिपचा सर्वात मोठा फायदा हा कि बॅटरी जास्त वेळ टिकते. मॅकबुक एअरची बॅटरी १५ ते १८ तास चालते तर मॅकबुक प्रोची बॅटरी १७ ते २० तास चालते. इतकी प्रचंड बॅटरी क्षमता असलेले इतर लॅपटॉप्स बाजारात सध्या उपलब्ध नाहीत त्यामुळे एम १ चिपची हि एक जमेची बाजू म्हणता येईल.

Image By – Apple

७. मॅक ओ.एस.

एम १ चिपसाठी मॅक ओ.एस. “बिग सर” बनवण्यात आली आहे. मॅकबुकमधील सर्व गोष्टी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आता ॲपलच्या नियंत्रणाखाली आल्याने एम १ आणि मॅकबुकला तोड नाही.

८. ॲप्स आणि गेम्स

एम १ चिपमुळे आयफोन, आयपॅडचे ॲप्स आणि गेम्स आता मॅकबुकवर चालवता येणे शक्य झालं आहे. त्याच बरोबर रोझेटा कंपायलर मुळे इंटेल आधारित ॲप्स आणि गेम्स नवीन मॅकबुकवर चालवता येऊ शकतात.          

निष्कर्ष

एकूणच हे सर्व फीचर्स लक्षात घेता बरेच लोक मॅकबुक कडे वळतील असा अंदाज आहे आणि त्यातील बरेच लोक विंडोज सोडून मॅक वापरणारे असतील. किंमतीच्या बाबतीत बोलायचं तर ॲपलने दोन्ही मॅकबुकची किंमत मागील मॅकबुक इतकीच ठेवली आहे. हे सर्व असलं तरी एम १ हि ॲपलने बनवलेली सर्वात स्लो चिप असेल कारण ॲपलने या चिपच्या सुधारित आवृत्तीवर (M1X किंवा M2) काम सुरु केलं आहे. या सुधारित आवृत्तीत १२ कोर असतील अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत किंवा वर्षाअखेर पर्यंत सुधारित आवृत्तीसहित नवीन मॅकबुक बाजारात दाखल होतील.

apple silicon m1 chip akash jadhav

संबंधित व्हिडिओ

Share

आकाश जाधव

Software Engineer | Tech Enthusiast & Proud Geek

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.